हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृती हि जगातील सर्वात प्राचीन संस्कुतीपैकी एक आहे.हिचा कालखंड विलार्ड लिबी यांच्या कार्बन १४ च्या वैज्ञानिक पद्धतीनुसार इ.स.पूर्व २७०० ते इ.स. पूर्व १५०० असा मानला जातो . जवळजवळ १५० वर्षापूवी म्हणजेच इ.स. १९२१ मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे लाईन टाकण्यासाठी प्रथम हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरु झाले,म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले.आत्ता हे स्थळ आधुनिक पाकिस्तानात आहे.तसेच हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती या नवाने सुद्धा ओळखले जाते.हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे ६५० किमी अंतरावर सिंधु नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले.हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले आहे त्यांच्यात कमालीचे साम्य आहे.
हडप्पा संस्कृतीचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरु केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.नागरी हडप्पा संस्कृतीचे बीजे बलुचिस्तानातील मेहेरगड येथील हडप्पापूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात.धोलावीरा,लोथल,कालीबंगन,दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननातून अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहे.हडप्पा संस्कृतीचे वैशिष्टे ही सर्वसाधारणपणे सारखीच आढळतात. नगररचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाणी व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी मृतदेह पुरण्याची व्यवस्था पद्धत यांचा त्यांत प्रामुख्याने समावेश होतो.या शहरांचा निर्माण ४७०० वर्षा झाला होता.
हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती.काही ठिकाणी कच्या विटा आणि दगडांचा वापर बांधकामासाठी केला जाई. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालये असत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी उत्तन व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पान्हाळीचा वापर केला जाई. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत.ती झाकलेली असत.यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसते.
रस्ते रुंद असून ते एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पध्दतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणारी चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधत असत. नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे.प्राचीन इजिप्त व मोसेपोटेमिया या समकालीन संस्कृतीच्या प्रमाणे हडप्पामध्ये भव्य मंदिरे व तत्सम बांधकामे होती असे काही पुरावे मिळाले आहेत.
मुद्रा व भांडी
हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या ,स्टीएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात.मुद्रावर विविध प्राण्यांचे आकृती आहेत.त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा,वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी देखील पाहवयास मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमानेच मनुष्यकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारखे प्रतीकांचा समावेश आहे. लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाचे नक्षी काढलेली भांडी आहेत. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत.
लोकजीवन
हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत.त्यामध्ये गहू,सातू,ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पिक तर गुजरातमध्ये नाचणीचे पके मोठ्या प्रमाणात घेतली जात होती.याखेरीज वावाटाणा, तीळ,मसूर इत्यादी पिके काढली जात.हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहित असावा.उत्खननात मिळालेली पुतळे,मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत. स्त्री- पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता.
विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने,तांबे, रत्ने, तसेच शिंपले,कवड्या, बिया, इत्यादीचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपटा,हें अलंकार स्त्री- पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगळ्या घालत.हडप्पाकालीन कलेचे उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ठपूर्ण पुतळा.त्यांच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे,एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रीदलाची नक्षीही अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे.
महास्नानगृह
मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडलेआहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ २.५ मीटर खोल होता. त्यांची लांबी सुमारे १२ मीटर आणि रुंदी ७ मीटर होती.कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्या विटांनी बांधलेली होती. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. यांच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फुट रुंदीचे असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती.स्नानगृहात वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची देखील व्यवस्था केलेली होती.यावरून हडप्पाकालीन लोक आरोग्याबद्दल किती जागरूक होती हे दिसून येते.
हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगला दर्जाचा कापूस होत असे.तो पश्चिम आशिया,दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे.सुती कापड देखील निर्यात होत असे.इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत.काश्मीर,दक्षिण भारत,इराण, अफगाणिस्तान,बलुचिस्तान येथून चांदी, जस्त,मौल्यवान खडे,मनके,देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात.परदेशांशी चालणारा व्यापार खुश्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे.उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे.हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे.
ऱ्हासाची करणे
पुन्हा पुन्हा येणारा महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या.त्यांचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्रपातळीतील बदल यांसारख्या कारणामुळेही काही स्थळ उजाड झाली.अशा कारणामुळेही लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती.तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला.
Tags
शिक्षण